Search This Blog

MPSC:एमपीएससीमधे यशस्वी होण्याचा मंत्र!!!

मुख्य परीक्षा:सर्वागीण, नेमका व नियोजित अभ्यास  हाच  एमपीएससीमधे यशस्वी होण्याचा मंत्र!!!!!!!!!!!

सौजन्य-तुकाराम जाधव
                                   

 एमपीएससी ही एक स्पर्धात्मक परीक्षा असल्याने आपण स्वत:ला कसे सिद्ध करतो आणि इतरांच्या तुलनेत कसे सरस ठरतो’, यावरच आपले यश अवलंबून आहे. त्यादृष्टीने विचार केल्यास राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप, म्हणजे त्यातील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यांचे स्वरूप बारकाईने लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. प्रस्तुत बाबी लक्षात घेतल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, ‘ अभ्यास किती व कसा करायचा?’ या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्यांला लवकरात लवकर समजते-उमजते तो विद्यार्थीच या परीक्षेत इतरांच्या तुलनेत सरस ठरतो. मागे अधोरेखित केल्याप्रमाणे राज्यसेवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करण्यापूर्वी योग्य नियोजनाची आखणी करणे ही प्राथमिक बाब ठरते. त्यासाठी प्रस्तुत टप्प्याचा अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची पुस्तके, त्या-त्या अभ्यास घटकातील आपली गती आणि त्या विषयाला परीक्षेत असणारे गुणांच्या भाषेतील महत्त्व या घटकांच्या आधारे वेळ व अभ्यासाचे नियोजन करावे. अर्थात हा अभ्यास सर्वागीण म्हणजे त्यातील संकल्पना, सिद्धांत, आकडेवारी, त्यातील कल आणि एकंदर विषयासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडी या बाबींना लक्षात घेऊन करावा. अभ्यास करत असतांनाच त्या-त्या घटकावर आतापर्यंत आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न याचा सतत विचार करावा. थोडक्यात, आपण जे काही वाचत आहोत त्यावर कशाप्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचे नेमके उत्तर कोणते याचा सतत विचार करणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळेच आपल्या तयारीत परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यासाठी अधिकाधिक सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्यावा आणि त्याद्वारे स्वत:चे मूल्यमापन करावे. आपल्या मूल्यमापनातून जे कच्चे दुवे लक्षात येतील त्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा. या संदर्भात सतत लक्षात ठेवायची बाब म्हणजे अभ्यासातील सातत्य होय. कारण राज्यसेवेची प्रभावी तयारी करण्यासाठी किमान एक वर्ष नियमित १०-११ तासांची गरज आहे यात शंका नाही. त्यामुळे अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाला योग्य वेळ देऊन त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य बनते. यासाठी अभ्यासातील सातत्य व नियमितता या बाबींना पर्याय नाही. अन्यथा, एखाद्या घटकाला वेळ अपुरा पडण्याचीच शक्यता आहे. म्हणूनच कधी जास्त, कधी कमी असे न करता अत्यंत नियोजनबद्धपणे नियमित अभ्यास करण्यावर भर द्यावा.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets