Search This Blog

How to Study MPSC Rajyaseva Prelim?

सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) PAPER I
 हा अनेक अर्थाने राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 
एकूण ४०० गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन या घटकाला २०० गुण निर्धारित केले आहेत.
 प्रस्तुत लेखात सामान्य अध्ययन या पेपरच्या रणनीतीची सविस्तर चर्चा केलेली आहे. सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) हा अनेक अर्थाने MPSC पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एकूण ४०० गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन या घटकाला २०० गुण निर्धारित केले आहेत. सामान्य अध्ययनातील घटकांच्या अभ्यासाची व्याप्ती, द्यावा लागणारा वेळ, उत्तरोत्तर बदलणारे स्वरूप आणि नकारात्मक गुणपद्धती इत्यादी कारणांमुळे सामान्य अध्ययनाची काळजीपूर्वक तयारी करणे गरजेचे बनले आहे. किंबहुना यावर्षीपासून अनेक कारणांमुळे सामान्य अध्ययन हा विषयच महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे या विषयावर विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने तयारीच्या प्रारंभीच पुढील तीन बाबींची पूर्तता करावी.
१) सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन,
 २) मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
३) घटकवार संदर्भग्रंथाची यादी.


 ही माहिती जमा केल्यानंतर एका बाजूला अभ्यास धोरण’, तर दुसऱ्या बाजूला वेळेचं नियोजन करणे सुलभ जाते. पूर्वपरीक्षेची तयारी सुरू करताना अभ्यासक्रम पाहिल्यानंतर प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अगत्याचे ठरते. मागील किमान १० वर्षांच्या यूपीएससी प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करावे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यामुळे अभ्यासाची दिशा निश्चित व स्पष्ट होते. त्यामुळे एकतर त्या त्या घटकांवरील प्रश्नांची संख्या, त्याचे स्वरूप आणि त्यात होणारे बदल लक्षात घेता येतात. अशा रीतीने या प्राथमिक बाबी हाती घेतल्यानंतर अभ्यासाचे धोरण व नियोजन आखून त्याची अंमलबजावणी सुरू करावी.


MPSC पूर्वपरीक्षेच्या तयारीसंदर्भात प्रत्येक विद्यार्थ्यांने सुरुवातीलाच पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. 

एक म्हणजे यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी किमान 3-4 महिन्यांचा कालावधी आवश्यक ठरतो. 
दुसरे म्हणजे उपलब्ध वेळेपैकी साधारणत: ६० टक्के वेळ सामान्य अध्ययनाला (म्हणजे ४० टक्के वेळ नागरी सेवा कल चाचणीस) देणे अपेक्षित आहे. सा. अध्ययनातील प्रत्येक घटकाला आपण किती वेळ देणार आहोत हेही निश्चित करणे ही तिसरी आवश्यक बाब आहे. 


चौथे म्हणजे प्रत्येक संदर्भ संपूर्ण नियोजनात तीन वेळा वाचला जाईल याची खबरदारी घ्यावी.


 पाचवे म्हणजे उजळणीचेही वेळापत्रक तयार करावे. 


सहावे म्हणजे विविध घटकांवरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव नियोजनात अत्यावश्यक मानावा आणि शेवटी विद्यार्थ्यांने 


सामान्य अध्ययनाबाबतच्या व्यूहरचनेत आपण कोणत्या घटकास प्राथमिकता देणार आहोत, म्हणजेच प्राधान्य देणार आहोत, हे ठरविणे गरजेचे आहे. यानुसार सा.अ.तील सर्व घटकांची एक अग्रक्रमाची यादी तयार करावी.

पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे सर्वसाधारणत: तीन टप्पे पाडता येतील. प्रत्येक संदर्भग्रंथाचे किमान तीन वेळा वाचन आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन हे टप्पे केलेले आहेत. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात त्या त्या घटकांवरील संदर्भग्रंथापैकी पायाभूत असणाऱ्या ठउएफळच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. एका अर्थाने ठउएफळ चे वाचन प्राथमिक स्वरूपाचेच आहे. विषयवार वाचन करत असताना त्यातील संकल्पना, सिद्धांत, युक्तिवाद यांच्या अचूक आकलनास अत्यंत महत्त्व आहे. कारण जी.एस.मधील बरेच घटक नवीनही असू शकतात. ज्यासंबंधी विद्यार्थी प्रथमच वाचन करीत असतो.


 त्यामुळे त्या त्या घटकांतील संकल्पना व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उदा. अर्थव्यवस्थेच्या घटकात, उत्पन्नाचे प्रकार, महसुली तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? राज्यघटनेत गणराज्य, धर्मनिरपेक्षता, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय? न्या. पुनरावलोकन व न्या. सक्रियता म्हणजे काय? इत्यादी. म्हणजे प्रत्येक विषयातील मूलभूत सिद्धांत, संकल्पना नीट लक्षात आल्यास त्याचा इतर प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे फायदा होतो. आपला संकल्पनात्मक पाया हा मजबूत असला पाहिजे याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. प्रत्येक घटकाची प्राथमिक; परंतु मूलभूत स्वरूपाची तयारी केलेली असल्यामुळे त्यावरील इतर प्रमाणित संदर्भाचे वाचन सोयीस्कर ठरते. 


उदा. आधुनिक भारताच्या इतिहासावरील NCERT वाचल्यानंतर बिपन चंद्रा यांचे Struggle for India's Independence  हे पुस्तक, भारतीय घटनेसाठी डी.डी. बसू व एम. लक्ष्मीकांत यांचे पुस्तक वाचावे. पहिल्या टप्प्यातील हे वाचन सविस्तर, सखोल असायला हवे. तसेच प्रत्येक संदर्भ वाचताना त्यातील माहितीप्रधान, आकडेवारीचा, तांत्रिक भाग कोणता हे लक्षात घेतले पाहिजे. अशा भागास अधोरेखन करून ठेवणे अथवा त्याच्या मायक्रोनोट्स काढणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पूर्वपरीक्षेसाठी नोट्स काढताना कमीतकमी व अत्यावश्यक भागाच्याच नोट्स काढाव्यात. शक्यतो संदर्भ पुस्तकात अधोरेखनाचा मार्ग अवलंबावा आणि महत्त्वाच्या बाबीच नोट्स स्वरूपात लिहून काढाव्यात. त्यासाठी डायरी फॉर्मचा स्वीकार करावा.

पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचा दुसरा टप्पा म्हणजे दुसरे वाचन अथवा पहिली उजळणी. दुसऱ्या वाचनात अभ्यासाच्या मजबुतीकरणास महत्त्व आहे. या पहिल्या उजळणीत त्या त्या घटकाचे आकलन अधिक बिनचूक, स्पष्ट करण्यावर भर हवा. या टप्प्यात सुरू करावयाची एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्नांचा सराव ही होय. पूर्वपरीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे स्वत:च्या अभ्यासाची पडताळणी पाहता येते. आपल्या तयारीतील कच्चे दुवे लक्षात घेऊन त्यावर मात करता येते आणि महत्त्वाचे म्हणजे त्या त्या घटकांसंबंधी तर्कशुद्ध विचार करण्याची सवय निर्माण होते. ज्यातून Elimination  चे कौशल्य विकसित होईल.


 प्रश्नांचा सराव केल्यामुळे तयारीचा वेग व गुणवत्तादेखील वाढते. त्यामुळे प्रत्येक घटकावर किमान दीड-दोन हजार बहुपर्यायी प्रश्न सोडवले जावेत याची काळजी घ्यावी. बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करतेवेळी जागरूकतेने सोडवलेल्या प्रश्नोत्तरांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. यात आपल्याला किती प्रश्नांबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता? त्यातील किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली? किती प्रश्नांची उत्तरे चुकली व का चुकली? हा विचार करावा. तसेच काही धोका पत्करावा लागणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत का? नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत? हे सूक्ष्मपणे लक्षात घ्यावे. याद्वारेच आपला अभ्यास अधिक नेमका व अचूक करता येईल. एकंदर अभ्यास धोरणात दुसऱ्या वाचनापासून प्रश्नांच्या सरावाचा भाग उत्तरोत्तर वाढवावा.

अभ्यासाचा तिसरा टप्पा हा दुसऱ्या उजळणीचा म्हणजे तिसऱ्या वाचनाचा व अखेरचा टप्पा होय. या टप्प्यात मात्र, केवळ निवडक बाबींचे वाचन केले जावे. अत्यंत महत्त्वाचा तसेच जो माहितीप्रधान, विस्मरणात जाऊ शकतो असा भाग पुन:पुन्हा वाचणे आवश्यक ठरते. त्यामुळे विस्तृत वाचनाऐवजी एखाद्या खंडय़ा पक्ष्याप्रमाणे अत्यावश्यक तेवढाच (नेमका) महत्त्वाचा भाग वाचावा. महत्त्वाचे म्हणजे प्रश्नांचा सराव अधिकाधिक करावा. अभ्यासाच्या वेळेपैकी ५० टक्के वेळ प्रश्नांच्या सरावासाठी दिला तरी काही हरकत नसावी.

प्रस्तुत अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करताना उपलब्ध वेळेचे दीर्घकालीन व दैनंदिन नियोजन असे वर्गीकरण करावे. दीर्घकालीन नियोजनात तीन टप्पे पाडावेत व अभ्यासाच्या आशय व स्वरूपानुसार त्यात विशिष्ट वेळ समाविष्ट करावा.


 यानुसार पहिल्या टप्प्यात/ वाचनास जास्त वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेतील साधारणत: अर्धा वेळ म्हणजे दोन महिने या पहिल्या वाचनास द्यावेत. त्यानंतर उरलेल्या वेळेपैकी दीड महिना दुसऱ्या वाचनास व उर्वरित वेळ तिसऱ्या वाचनास द्यावा. दुसऱ्या बाजूला वेळेचे दैनंदिन नियोजन करताना दररोज


 १) सामान्य अध्ययनातील एक अभ्यासघटक (सुमारे ५ तास)
२) वर्तमानपत्रे (२ ते २.५ तास) आणि 
३) नागरी कल चाचणीतील एखादा घटक (३ ते ३.५ तास) अशी विभागणी करावी. यासंदर्भात एक महत्त्वाची बाब म्हणजे फ्रंटलाइन, योजना, क्रोनिकल, इंडिया इयर बुक व आर्थिक पाहणी अहवाल यासारख्या संदर्भसाहित्यासाठी आठवडय़ातील दीड ते दोन दिवस राखीव ठेवावा. त्यामुळे समांतरपणे या संदर्भग्रंथाची तयारी सुरू राहिल्याने अभ्यासाचे ओझे आपोआपच कमी होत जाईल.

वेळेच्या नियोजनासंदर्भात आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे प्रत्येक अभ्यास घटकास द्यावयाचा कालावधी होय. त्या त्या घटकासाठी पाहावयाची संदर्भ यादी आणि स्वत:ची पाश्र्वभूमी व त्यासंबंधीची तयारी लक्षात घेऊन प्रत्येक घटकासाठी कालावधी निर्धारित करावा आणि त्या वेळेत तो घटक तयार करावा.

अभ्यास व वेळेच्या नियोजनासंदर्भात चौकट ठरवली असली तरी त्यात एक लवचिकता राहील याची काळजी घ्यावी आणि महत्त्वाचे म्हणजे नियोजनाची सातत्याने अंमलबजावणी झाली पाहिजे यावर आपला कटाक्ष हवा. अन्यथा कागदी नियोजन व्यर्थच आहे हे सांगणे नको! त्यामुळे ठरवलेल्या वेळात निर्धारित बाबी वाचून होत आहेत का? त्यात काय अडचणी येत आहेत? हे लक्षात यावे यासाठी नियोजनाचे सातत्याने पुनरावलोकन गरजेचे ठरते.

यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या स्वरूपात सामान्य अध्ययन हा विषय मध्यवर्ती ठरणार आहे. हे लक्षात घेऊनच यावर भर देणे महत्त्वाचे आहे हे प्रारंभीच म्हटले आहे. कारण सामान्य अध्ययन व नागरी सेवा कल चाचणी या दोन पेपर्सचा विचार करता हे लक्षात घ्यावे लागते की, नागरी सेवा कल चाचणी पेपर तयार करताना सर्वच विद्यार्थ्यांचा (ग्रामीण, निमशहरी, प्रादेशिक भाषेतून शिक्षण झालेल्या) विचार केला जाईल. मात्र सामान्य अध्ययनाच्या बाबतीत सर्व विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात एकाच पातळीवर असल्याने हा पेपरच अधिकाधिक आव्हानात्मक केला जाईल. म्हणूनच विद्यार्थ्यांनी यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय कल चाचणीच्या बाबतीत गणित, बुद्धिमापन चाचणीतील काही सूत्रे व पद्धती आणि इंग्रजीच्या संदर्भातील काही व्याकरणासंबंधी बाबी वगळल्यास सामान्य अध्ययनाप्रमाणे माहिती, आकडेवारी अथवा संकल्पना-सिद्धांत अनेकदा वाचून लक्षात ठेवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कल चाचणीच्या बाबतीत नियमित सराव हाच घटक कळीचा ठरणार आहे. त्यामुळे सामान्य अध्ययन हाच पूर्वपरीक्षेत निर्णायक ठरण्याची अधिक शक्यता आहे. याचा अर्थ कलचाचणी महत्त्वाची नाही असे नाही किंवा त्यास फारच कमी वेळ द्यावा असे नाही. त्याची योग्य ती तयारी करावी लागणारच आहे. ज्याविषयी पुढील लेखात सविस्तरपणे चर्चा केली जाणार आहे. 

एकंदर सामान्य अध्ययनाचा बदलता अभ्यासक्रम व बदलत्या स्वरूपाचे योग्य आकलन : त्यासाठी दर्जेदार संदर्भग्रंथाची निवड : प्रत्येक घटकावरील संदर्भ साहित्याचे किमान तीन वेळा वाचन : बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव या अभ्यासपद्धतीचा अवलंब केल्यास सामान्य अध्ययनाचे शिखर यशस्वीरीत्या गाठता येईल यात शंका नाही.


Source-- Loksatta 

3 comments:

 1. माहिती बद्दल धन्यवाद् सर !! मी बँकेत नोकरी करतोय. तुमचा ब्लॉग वाचल्यावर MPSC prepare करण्याच प्लानिंग करतोय. पण जोबसोबात ते शक्य होइल का ? कारण जॉब सोडणे शक्य होणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे
  Job timing is 10 to 6 in a day time.

  ReplyDelete
 2. sir mala pan tayari karaychi ahe parntu mazyakade pustakacha satta uplabdha nahi ani konte pustak ghayche yachi suddha kalpana nahi sir kay karu tayari tar karaychi ahe ani pustak ghayche ahe sir

  ReplyDelete
 3. Sir,

  Mi sadhya job kartoy n mala MPSC study chalu karayach ahe, tar mi job karta krta study karu shakto ka? n sadharanata dararoj kiti tas study karne avashyak ahe?

  ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets