मराठी भाषा ही मुख्यत : आज महाराष्ट्र राज्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण प्रदेशात बोलली जाते. तिच्या उत्तरेला गुजराती, राजस्थानी, भिल्ली व हिंदी व तेलगू दक्षिणेला कन्नड व कोकणी या भाषा, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
भाषिकांच्या संख्येच्या मानाने मराठी ही भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. तिचा क्रम हिंदी (१३.३४, ३५,३६०), तेलगू (३,७६, ६८, १३२) व बंगाली (३, ३८, ८८, ९३९) यांच्यानंतर येतो.
भारतातील १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे एकंदर मराठी भषिकांची संख्या ३, ३२, ८६,७७१ इतकी होती. त्यातले ३,०२,७८,९१३ महाराष्ट्र राज्यात असून उरलेले ३०, ०७,८६८ भारताच्या इतर प्रदेशात होते. त्यांपैकी सर्वांत जास्त, म्हणजे १२,५६,६८२ मध्य प्रदेशात असून त्यानंतर अनुक्रमे पुढील येतात: कर्नाटक १०,७२,४१९, आंध्र २,८६,७३७, गुजरात २,०८,१९२, तमिळनाडू ५२, ३६३, दाद्रा-नगर हवेली ३४,११८.उत्तर प्रदेश १४,५५९, पश्चिम बंगाल १३,२८०, गोवा-दमण-दीव ११,८१३, राजस्थान ९,१८३, दिल्ली ७, ५७८, आसाम ५,४९७, बिहार ५,०७४, पंजाब ४,८५३, ओरिसा २,९७० ईशान्य सरहद्द प्रांत २४२, काश्मीर २२६ पॉंडिचेरी २०३, सिक्कीम६१, अंदमाननिकोबार ५६, नागालॅड ५१.हिमाचल प्रदेश ३०. त्रिपुरा २० मणिपूर. ६ लखदीव इ. ५.
वरील संख्येत खानदेशीचा समावेश नाही. तिच्या भाषिकांचा आकडा ४,२८,१२६ होता पण लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या वर्गीकरणानुसार तिचा समावेश मराठी, गुजराती, हिंदी व राजस्थानी यांनी मर्यादित अशा भिल्ली भाषासमूहाबरोबर केलेला आहे.
शिक्षण, नोकरी, व्यापार इत्यादींच्या निमित्ताने परदेशात असलेल्या शेकडो मराठी भाषिकांचा यात समावेश नाही. याशिवाय मराठीची एक पोटभाषा बोलणारे काही हजार लोक मॉरिशस बेटात आहेत.
वर्गीकरण : मराठी ही इंडो-यूरोपियनच्या भारतीय आर्थ शाखेची (कोकणी व सिंहली या भाषा सोडल्यास) सर्वात दक्षिणेकडची भाषा आहे. ग्रीअर्सन याने भारतीय आर्य भाषांचे बाह्य, आंतर व मध्य असे वर्गीकरण केलेले आहे. बाहेरच्या सर्व बाजूंनी परभाषा किंवा आंतर भाषा तसेच सागरी परिसराने वेढलेल्या त्या बाह्य (मराठी, सिंधी, उडिया, बिहारी, बंगाली, असमिया इ.), केवळ बाह्य भाषा किंवा सागरी परिसराने वेढलेल्या त्या आंतर (पहाडी, पश्चिम हिंदी, बांगडू, ब्रज, कनौजी, बुंदली, पंजाबी, डोगरी, गुजराती, भिल्ली, खानदेशी, राजस्थानी इ. ) केवळ आंतर भाषांनी वेढलेल्या मध्यवर्ती त्या मध्य (पूर्व हिंदी: अवघी, बाधेली, छत्तीसगढी इ.).
मराठी ही आर्य भाषा गुजराती, राजस्थानी, भिल्ली, व हिंदी या आंतर भाषा व सागरी परिसर यांनी वेढलेली आहे. पण समुद्राच्या अडथळ्यामुळे तिचा प्रदेश बाह्य संपर्कापासून अलिप्त न रहाता परकीय प्रवासी, आक्रमक व्यापारी इत्यादींचे फार प्राचीन काळापासून लक्ष्य बनलेला आहे. त्या मानाने बंगालच्या समुद्राला लागून असलेला प्रदेश अशा संपर्कापासून बराच मुक्त होता.
पोटभाषा व बोली : मराठीच्या पोटभाषांचा पद्धतशीर अभ्यास झालेला नाही. ग्रीअर्सनने वेगवेगळ्या भागांतले नमुने गोळा करून दिल्यामुळे पोटभाषांचे पुसट चित्र आपल्याला मिळते. पण सबंध भाषिक प्रदेशाचा अभ्यास झाल्याशिवाय हे चित्र स्पष्ट होणार नाही.
पोटभाषांच्या वर्गीकरणात ध्वनी, व्याकरणप्रक्रिया व शब्दसंग्रह यांच्यातील भेदांचा विचार करावा लागतो. इतर काही मराठी बोलींतील ळ च्या ल किंवा य किंवा र असणाऱ्या बोली निश्चितपणे वैशिष्यपुर्ण आहेत. तीच गोष्ट ला (मला) याऐवजी ले (मले) किंवा-आक (माका, घराक) यांचा उपयोग करणाऱ्या बोलींची. अशा प्रकारची वैशिष्टये आणि त्यांची प्रदेशवार व्याप्ती, म्हणजे भौगोलिक मर्यादा, शोधून काढल्याशिवाय मराठीचे म्हणजेच ती ज्या पोटभाषा, बोली यांनी बनली आहे. त्यांचे स्वरूप निश्चत होणार नाही. त्याचप्रमाणे जाती, धर्म वर्ग इ. स्पष्टपणे भिन्न असणाऱ्या समूहांच्या बोलींचे बौगोलिक सहअस्तित्व लक्षात घेणेही या बाबतींत आवश्यक आहे.
सध्यातरी किनारपट्टीतील ‘सागरी’ किंवा कोकणी मराठी, घाटाच्या पूर्वेला लागून असलेली देशी, उत्तरेकडील ‘खानदेशी’ पुर्वेकडील ‘वऱ्हाडी’ आणि साधारणत : मध्यवर्ती अशी मराठवाडयाची ‘दक्षिणी’ असे भेद नजरेत भरतात. त्यातही गोदावरीच्या दक्षिणोत्तर असलेला पैठणच्या आसपासचा भौगोलिक प्रदेश हा आजही मराठीच्या अभ्यासाचा मध्य किंवा प्रारंभबिंदू मानायला हरकत नाही.
पुण्यामुंबईकडची मराठी ती प्रमाण मराठी असे म्हणण्याचा प्रघात आहे. प्रमाण भाषेचे स्वरूप द्विविघ असते: म्हणजे ग्रांथिक व सभासंमेलनातले म्हणजे बोलण्यातील शिष्ट. लिखीत रूप परंपरानिष्ठ असते आणि आता ते केवळ गंभीर लेखनापुरतेच मर्यादीत राहिले आहे, तर बोलरूप प्रसंगानुरूप बदलत असते. शिवाय मुबंई व पुणे या प्रमाणे नागपूर, औरंगाबाद कोल्हापूर इ. महत्त्वाच्या केंद्रांतील भाषाही आता प्रमाण झालेल्या आहेत, हे लक्षात घेऊनच प्रमाण भाषेसंबंधी बोलले पाहिजे.
इतिहास : भाषेचा इतिहास म्हणजे काळाच्या ओघात भाषेत घडून आलेल्या परिवर्तनाची पद्धतशीर मांडणी. यातील काही परिवर्तने स्वाभाविकपणे घडून येतात. तर कही सामाजिक परिस्थितीमुळे. ही परिस्थिती समाजातील अंतर्गत घटनांमुळे किंवा घडामोडींमुळे निर्माण होईल किंवा बाह्य संपर्कही तिच्या मुळाशी असू शकेल.
मराठीही संस्कृतोद् भव भाषा आहे, म्हणजे ते संस्कृतचे काळाच्या ओघात विशिष्ट दिशेने परिवर्तित झालेले रूप आहे.
मूळ संस्कृत भाषा वायव्य भारतातून पूर्वेकडे व खाली दक्षिणेकडे पसरत गेली. एखादी पसरणे म्हणजे भाषिकांनी नवनव्या प्रदेशांवर आक्रमण करणे वा इतर भाषिकांनी आपली मूळ भाषा टाकून तिचा स्वीकार करणे. संस्कृतच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर ज्या इतर भाषिकांनी तिचा स्वीकार केला, त्यांचे प्रमाण मूळ भाषिकांच्या कितीतरी पटीने जास्त आहे. आज मराठी बोलणाऱ्या लोकांत मुळ आर्यवंशीय लोकांचे वंशज जवळजवळ नाहीतच असे म्हणता येते. उत्तरेकडील डोंगरळ भागात ऑस्ट्रिक, तर पूर्व व दक्षिण भागात द्रविड निम्नस्तराचा तिच्यावर बराच परिणाम झाला असावा. ऐतिहासिक काळात राजकीय वर्चस्वामुळे सुरूवातीला मुसलमानी सत्तेखाली तुर्की, अरबी व फार्सी, तर पुढे पोर्तुगीज व इंग्रजी यांचा फार प्रभाव पडला.
इंग्रजीच्या प्रभावाची आगेकूच अजून चालू आहे. ती फार्सीप्रमाणे केवळ राज्यकर्त्याची भाषा नसून जागतिक महत्वाची सांस्कृतिक प्रतिष्ठा असलेली ज्ञानभाषाही आहे. मराठीने तिच्यातून शेकडो शब्द, वाक्यप्रयोग, विचार तर घेतले आहेतच पण शिवाय अँ व ऑ हे स्वरही उचलले आहेत. या प्रभावाचा कालखंड अजून संपलेला नाही. हा प्रभाव इतका खोलवर गेलेला आहे, की कोणताही सुशिक्षित किंवा अल्पशिक्षीत माणूसही आवस्यक नसतानाही इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्याचे तुकडे, मराठी व्याकरणाप्रमामे चालमारी इंग्रजी नामे, कर- किंवा हो- यांचे शेपूट लावून चालवलेली इंग्रजी क्रियापदे, तसेच इंग्रजी विशेषणे इत्यादींचा वापर केल्याशिवाय बोलूच शकत नाही.
महत्त्वाचे टप्पे : इतर आर्यभाषांप्रमाणेच मराठीच्या वेगळेपणाची जाणीव इ. स. १००० च्या आसपास होऊ लागते. यासंबंधीचा पुरावा कोरीव लेखांतून प्रारंभकाळातले स्पष्टपणे मराठी असे काही नमुने पुढीलप्रमाणे :
(१) इ. स. १११६-१७ मध्ये कोरलेली श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येतील ही दोन वाक्ये : ‘श्रीचावुण्डराजें करवियलें’‘श्रीगंगराजे सुत्ताले करवियले’.
(२) भूलोकमल्ललिखीत मानसोल्लास किंवा अमिलपितार्थ चिन्तामणि या शके १०५१ (इ. स. ११२९) मधील ग्रंथातले दोन उतारे : ‘जेणें रसातळउणु मत्स्यरूंपे वेद आणियले मनुशिवक वाणियले तो संसारसायरतरण मोह (हं) ता रावो नारायणु’. ‘जो गोपिजणे गा (मा,) यिजे बहु परि रूंपे निऱ्हांगो’...
(३) शके ११०८ (इ. स. ११८७) मधील शिलाहार अपरादित्याच्या (द्वितीय) परळ येथे सापडलेल्या लेखातील शापवचन: ‘अथ तु जो कोणु हुवि ए शासन लोपी तेया श्री वैद्यनाथ देवाची भालसकुंटुंबीआ पडें तेहाची माय गाढवें झविजे‘.
(४) खानदेशामधील पाटणचा शके ११२९ (इ. स. १२०७) चा शिलालेख. या लेखातील एक वाक्य असे: इयां पाटणीं जें केणें उधटे तेहाचा असि आउ जो राउला होंता ग्राहकापासी तो मढा दीन्हला...
वरील सर्व उताऱ्यांतील मजकूर मराठीच आहे, याबद्दल शंका नाही, त्यामुळे इ. स. १००० ही ढोबळ मानाने मराठी भाषिक कालखंडाची सुरूवात मानायला हरकत नाही. प्रारंभापासून आजपर्यंतच्या या भाषिक प्रवाहाचे अभ्यासाच्या सोयीसाठी कंड पाडमे इष्ट आहे. त्याचप्रमाणे त्यामागील तत्व निश्चित करमे ही आवश्यक आहे. सूक्ष्म आणि स्वतंत्र अभ्यासात हे काटेकोरपणे होईल. या ठिकाणी फक्त स्थूल मानाने हे शक्य आहे.
(१) प्राचीन कालखंड: (अ) कोरीव लेखांतून दिसणारे मराठीचे पूर्वप्राचीन रूप. (ब) यादवकाळात मुसलमानी सत्ता पसरू लागतानाचे महानुभव, ज्ञानेश्वरी आणि त्यांना समकालीन असणारे उत्तरप्राचीन रूप.
(२) मध्य कालखंड: (अ) शिवपुर्व काल. मुसलमानी भाषांचा वाढता प्रभाव. (ब) शिवकाल. फार्सी वर्चस्वाची परिसीमा (क) शिवोत्तर काल. ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, लोकवाङमयातातून जिंकत भाषेचे दर्शन घडविणारा काळ.
(3) अर्वाचीन कालखंड : अव्वल इंग्रजी. मराठीचा नवा अवतार. व्याकरणे, पाठ्यपुस्तके शब्दकोश यांचा काळ. (ब) प्रबोधनकाल. साहित्य वैचारिक वाङमय इ. मधून दिसणारे मराठीचे प्रचलित रूप.
पूर्वप्राचीन काळातील भाषिक पुरावा कोरीव असल्यामुळे थोडी मोडतोड सोडल्यास तो मूळ स्वरूपात आपल्याला मिळतो. त्यामुळे अभ्यासद्दष्टया तो विश्वासाई आहे. उत्तरप्राचीन रूपाचे तसे नाही. त्याची मुळ रचना तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातली असली, तरी त्या काळातले कागदपत्र आपल्याकडे नाहीत. ज्या काही साहित्याच्या हस्तलिखित प्रती तयार होत होत ते टिकून राहिले, त्याचे मुळ स्वरूप नकलाकारांच्या हातून कळतनकळत इतके बदलले, की त्यातले मूळचे काय व बदलेले काय याचा अभ्यास करमे, तसेच त्यासाठी एक नवीन चिकित्सापद्धती निर्माण करणे अपरिहार्य झालेले आहे.
अर्तात नुसती अभ्याससामग्री जमवून काही होनार नाही. भाषा शास्त्राची तत्वे, भाषेच्या इतिहासाचीपद्धती आणि या अभ्यासाला उपकारक अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ. सर्व प्रकारची माहिती असली, तरच निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढणे शक्य होईल.
स्रोत : मराठी विश्वकोश